BY: मच्छिन्द्र टिंगरे
बरामती तालुक्यातील सांगवी गावात कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे रेशन दुकानदाराकडून आजी-माजी महसूल अधिकाऱ्यांसह अनेकांची फसवणूक झाल्याची माहिती समोर येतं आहे. विशेष म्हणजे या रेशनिंग दुकानदाराने 18 महिन्यात दामदुप्पट करून देण्याचे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांसह अनेक शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. कष्टाचे पैसें अडकून बसले असून परत मिळण्याची आशा रामभरोसे झाली आहे.
बरामती तालुक्यातील सांगवी येथील एका रेशन धान्य दुकानदाराने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “१८ महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून देतो” असे आकर्षक आणि खोटे आमिष दाखवून या दुकानदाराने सामान्य नागरिकांसह आजी-माजी महसूल अधिकारी, व्यापारी आणि सुशिक्षित लोकांनाही जाळ्यात ओढल्याचे उघड झाले आहे.
विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना ठरल्याप्रमाणे परतावा देण्यात आला. मात्र त्यानंतर मोठ्या रकमा घेतल्यानंतर संबंधित दुकानदाराने पैसे परत देणे बंद केले. काहींना टाळाटाळ, तर काहींना थेट धमकावण्याचे प्रकारही घडल्याची चर्चा आहे. प्राथमिक माहितीनुसार या फसवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेत काम केलेले आजी-माजी महसूल अधिकारीही या फसवणुकीचे बळी ठरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे या दुकानदाराने किती नियोजनबद्ध पद्धतीने विश्वासघात केला याचे गांभीर्य अधोरेखित होते. अनेक गुंतवणूकदारांनी आपली आयुष्यभराची पुंजी, निवृत्तीचे पैसे आणि कर्ज काढून जमा केलेली रक्कम या फसवणुकीत गमावल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणी पोलिसांत तक्रारी देण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी तातडीने लक्ष घालून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी फसवणूकग्रस्तांकडून केली जात आहे.






