BY :मच्छिन्द्र टिंगरे -पुणे जिल्ह्यातील व्यापारी आणि आर्थिक वर्तुळात खळबळ उडवणाऱ्या निलेश रमेश कोरटकर या व्यक्तीविरुद्ध बनावट GST घोटाळ्यानंतर आता आणखी गंभीर आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्यानंतर, कोरटकरकडून बनावट वाहन क्रमांक वापरण्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. यामुळे यंत्रणांमध्ये मोठी खळबळ माजली असून, कोरटकरचे कारनामे दिवसेंदिवस धक्कादायक स्वरूप घेत आहेत.
विद्यार्थ्यांच्या नावावर बनावट GST नंबर – कोट्यवधींची फसवणूक
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, निलेश रमेश कोरटकर याने आपल्या ओळखीतल्या एका विद्यार्थ्याच्या नावाचा वापर करून त्याच्या नावावर बनावट GST नंबर नोंदवून घेतला होता. या GST नंबरच्या आधारे त्याने विविध कंपन्यांची आणि सेवांची बनावट बीलं तयार केली होती. ही सर्व बीलं खोटी असून, त्या आधारे त्याने सरकारकडून इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) स्वरूपात कोट्यवधी रुपयांचा फायदा घेतल्याचा संशय आहे.
बनावट गाडी नंबर वापरून सार्वजनिक वाहतूक – काय आहे खरी गोष्ट?
या प्रकरणाचे पडसाद अद्याप थांबले नसतानाच आता कोरटकर याने बनावट गाडी क्रमांक वापरल्याचे समोर आले आहे. कोरटकर सध्या वापरत असलेली “किया सेल्टॉस” ही लक्झरी कार MH 42 BE 5799 या वाहन क्रमांकाने रस्त्यावर दिसून आली आहे. या क्रमांकाची चौकशी केली असता, ही गाडी लोणीदेवकर गावातील एका नामांकित व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मात्र, कोरटकर वापरत असलेली गाडी ही संबंधित व्यक्तीच्या मालकीची नसून, या नंबर प्लेटचा बनावट वापर करून एक वेगळीच गाडी वापरली जात आहे. म्हणजेच, कोरटकरकडील गाडीला मूळ मालकाशी काही संबंध नसलेल्या वाहनाचा नंबर वापरून सार्वजनिक ठिकाणी वापरले जात आहे.
हा बनावट नंबर गुन्हेगारी हेतूने वापरला जातोय का?
बनावट गाडी नंबर वापरणे हे गंभीर गुन्ह्यांत मोडते. अशा प्रकारचा वापर अनेकदा गुन्हेगारी उद्देशाने केला जातो – जसे की
पोलिस तपास चुकवणे,
ट्रॅफिक चालान टाळणे,
चोरीच्या गाड्या वापरणे,
किंवा कोणताही गुन्हा करून गाडीचा मागोवा लागू नये यासाठी बनावट क्रमांकाचा वापर.
यामुळे पोलिस यंत्रणांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे. ही गाडी चोरीची आहे का? का दुसऱ्याच प्रकरणातील झोलबाज गाडी आहे, हे तपासायचं आहे. या गाडीचा वापर कोणत्या मार्गाने, कोणत्या ठिकाणी होत आहे, हे देखील तपासाच्या केंद्रस्थानी आहे.
पोलिसांनी घ्यावी तत्काळ कारवाई – स्थानिकांमध्ये संताप
सध्या स्थानिक नागरिकांमध्ये या प्रकाराबद्दल तीव्र संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे. आर्थिक घोटाळ्यांबरोबरच बनावट वाहन क्रमांकासारखा धोकेदायक प्रकार करत असलेली व्यक्ती मोकाट फिरत असल्याने प्रशासनाविषयी प्रश्न निर्माण होत आहेत.
संबंधित प्रशासन, पोलीस आणि RTO विभाग यांनी तातडीने याची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. संबंधित नामांकित व्यक्तीच्या नावाचा वापर वाहन क्रमांकासाठी झाल्यामुळे त्यांच्यावरही गैरसमज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे यासंदर्भात त्या कुटुंबाची चौकशी होणेही आवश्यक आहे.
संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशीची गरज
GST घोटाळा + बनावट वाहन नंबर = हे प्रकरण केवळ आर्थिक फसवणुकीपुरते मर्यादित नाही, तर त्यामागे एक गुन्हेगारी नेटवर्क असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या साखळीचा सखोल तपास करण्याची गरज आहे.
निलेश कोरटकर याच्या नावाशी संबंधित घोटाळ्यांची मालिका दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामध्ये फसवणूक, खोटी कागदपत्रं, बनावट GST क्रमांक, बनावट गाडी नंबर आणि सरकारची फसवणूक – हे सगळं चित्र अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळेवर हस्तक्षेप न केल्यास हे प्रकरण आणखी गंभीर स्वरूप घेऊ शकते.






